बिजापूर – छत्तिसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली दोन आयईडी स्फोटके सुरक्षा दलांनी वेळीच शोधली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्याशिवाय, घातपात घडवण्याचा नक्षलींचा डाव उधळला गेला.
छत्तिसगढच्या बिजापूर जिल्ह्यात पोलिसांचे बॉम्बनाशक पथक आणि डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड संयुक्त गस्त घालत होते. त्यावेळी त्या पथकाला रस्त्यालगत दोन आयईडी स्फोटके पेरून ठेवल्याचे आढळले. प्रत्येक स्फोटकाचे वजन सुमारे ५ किलो होते. त्यांच्या स्फोटांमुळे मोठी हानी घडू शकली असती. मात्र, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे ती टळली. संबंधित स्फोटके तातडीने निकामी करण्यात आली.
सुरक्षा दलांनी सरत्या वर्षात छत्तिसगढमध्ये विविध घटनांत तब्बल १८० आयईडी स्फोटके शोधली. सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्याच्या उद्देशातून तशाप्रकारची स्फोटके नक्षलवादी पेरून ठेवतात.