Narendra Modi – ज्याचे समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काढले. भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि चिन्हावर छत्रपती शिवरायांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) राजमुद्रेची छाप असल्याचेही ते म्हणाले.
नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
नरेंद्र मोदी म्हणाले, शिवरायांनी कमावलेली ती नौदलाची शक्ती आपण नंतर गमावली, आता ती पुन्हा मिळवायची आहे. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गवर साजरा होत आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
सशस्त्र दलांमध्ये महिलांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही सशस्त्र दलात महिलांची संख्या वाढविण्यावर भर देत आहोत. आज भारत स्वतःसाठी मोठी लक्ष्ये ठेवत आहे आणि ती लक्ष्ये साध्य करण्यासाठी आपली पूर्ण क्षमता वापरत आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, भारत ब्लू इकॉनॉमी आणि बंदराच्या नेतृत्वाखालील विकासाला अभूतपूर्व पाठिंबा देत आहे. व्यापारी शिपिंगला देखील प्रोत्साहन दिले जात आहे. भारत आपल्या महासागरांच्या क्षमतेचा वापर करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भारताचा इतिहास शौर्याचा आणि सामर्थ्याचा असल्याचे सांगत नरेंद्र मोदी म्हणाले की, एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते ते शिवाजी महाराजांनी जाणले. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. समुद्रावर ज्याचं वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे शिवाजी महाराजांनी ओळखले.
शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे यांच्यासारखी लोक उभी केली. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हे शिवाजी महाराजांच्या शक्तीचे प्रतिक आहे. भारतीय नौदलातील गटांचे भारतीयीकरण, त्यांची नावं भारतीय करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.