मुंबई – विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला आलेल्या अपयशाचा धक्का पचतो न पचतो तोवरच शिवसेना व पर्यायाने मविआला मोठा धक्का बसला आहे.शिवसेनेचे ठाण्याचे व संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचे शिलेदार म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड उभा केलं आहे. शिंदेंच्या या बंडाला थोड्या थोडक्या नव्हे तर ४० आमदारांचं बळ असल्याचं ते सांगतात. यावर आता सर्व राजकीय पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. यावर आता माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले,’शरद पवारांना भेटून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न मविआ सरकार करणार आहे. पवार साहेब आहेत तोपर्यंत ते लक्ष देतील.. ते पुढे म्हणाले पंतप्रधान देहूत संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथांना घेऊन गेले. संख्याबळ किती काय ते पाहावं लागेल’ असं म्हणत भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्व्हर ओकवर बैठक सुरु असून या बैठकीत , मंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, बाळासाहेब पाटील, जयंत पाटील असे नेते उपस्थित आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार चर्चा करणार आहेत. दुपार पर्यंत सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होऊ शकते.