हलकुडे चषक बुद्धिबळ स्पर्धा : तामिळनाडूच्या व्यंकटेशला विजेतेपदाची संधी

पुणे – तामिळनाडूचा ग्रॅंडमास्टर एम.आर.व्यंकटेश याने सातव्या फेरीअखेर सात गुण मिळवित भारतबाई हलकुडे स्मृती चषक अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाची संधी निर्माण केली. त्याने अन्य खेळाडूंपेक्षा अर्ध्या गुणाची आघाडी घेतली आहे त्यामुळे त्याच्याकडे विजेतेपदाची संधी अधिक आहे.

सिद्धी बॅंक्वेट्‌स हॉल (म्हात्रे पुलाजवळ) येथे जयंत गोखले बुद्धिबळ अकादमी व आर्यन एंटरप्राईज यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सातव्या फेरीअखेर गुसेन हिमाल व ए.आर.हरीकृष्णन हे दोन खेळाडू संयुक्तरित्या दुसजया स्थानावर आहेत. त्यांचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले आहेत. सुयोग वाघ, एम.विनयकुमार, संतायन दास, निरंजन नवळगुंड, विक्रमादित्य कुलकर्णी, राहुल संगमा यांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत. त्यांनी संयुक्तरित्या तिसरे स्थान घेतले आहे.

ग्रॅंडमास्टर व्यंकटेश याने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना सातव्या फेरीत महाराष्ट्राच्या सुयोग वाघ याच्यावर शानदार विजय मिळविला. आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाडू गुसेन याने एल.मुथाई याला चुरशीच्या लढतीनंतर पराभूत केले. महाराष्ट्राच्या ओम कदम याला उत्कंठापूर्ण लढतीत हरीकृष्णन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. ओम याने सातव्या फेरीअखेर साडेपाच गुण मिळविले आहेत. विनयकुमार याने पी.शामनिखिल याची विजयी घोडदौड रोखली. त्याने हा डाव बरोबरीत ठेवण्यात यश मिळविले. संतायन दास याला आर.शिवसुब्रमण्यम याच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले.

वैभव राऊत याने रंगतदार लढतीत ग्रॅंडमास्टर आर.आर.लक्ष्मण याला बरोबरीत रोखून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. फिडेमास्टर नवळगुंड याने पुष्कर डेरे याला पराभूत करीत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याच्या आशा कायम राखल्या. महाराष्ट्राच्या विक्रमादित्य याने आव्हान राखताना दिगंबर जाईल या स्थानिक खेळाडूवर मात केली. आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा याला आकाश दळवी याच्यावर मात करताना सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागले. ग्रॅंडमास्टर सप्तर्षी रॉय चौधरी याला करण त्रिवेदी याने बरोबरीत रोखले. रॉय चौधरी याचे आता साडेपाच गुण झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.