मुंबई – आयपीएल 2022मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने स्पर्धेच्या मध्यातच मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चेन्नईचे कर्णधारपद सोडले आहे. यामुळे महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व सोविण्यात आले आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. चेन्नईला 8 सामन्यांत 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. गतवर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईच्या संघाकडून यावेळीही चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे करण्यात कर्णधार रविंद्र जडेजा अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा धोनीच्या हातात संघाची सूत्रे आल्याने कामगिरीवर परिणाम दिसून येईल का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जला पुढील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचे आहे. डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात उद्या रविवारी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यावेळी चाहत्यांना पुन्हा एकदा माही टॉस करताना पाहावयास मिळणार आहे.