IPL 2021 | चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ‘सुपर’ विजय

मुंबई – चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी पुढे ठेवलेले १८९ लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला राजस्थान रॉयल्सच्या संघाचा डाव निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावांमध्ये उरकल्याने चैन्नईने हा सामना ४५ धावांनी जिंकला. सलामीवीर जॉस बटलर (४९) वगळता राजस्थानचा एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही.

तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जच्या फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू आणि मोईन अलीसह अखेरच्या षटकांमध्ये ब्राव्हाने केलेल्या आक्रमक खेळी 20 षटकात 9 बाद 188 धावांपर्यत मजल मारता आली. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी सलामी दिली. या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण ऋतुराजला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो चौथ्या षटकात 10 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मोईन अली आणि डू प्लेसिसने चेन्नईचा डाव पुढे नेला. पण सहाव्या षटकात डू प्लेसिस ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर रियान परागच्या करवी झेलबाद झाला. डू प्लेसिसने 17 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 33 धावांची वेगवान खेळी केली.

त्यानंतर मोईन अलीला रैना चांगली साथ देत होता. अलीनेही मागील काही सामन्यांप्रमाणे या सामन्यात फटकेबाजी केली. मात्र, तो दहाव्या षटकात 26 धावा करुन राहुल तेवातियाच्या गोलंदाजीवर बाद झाला.त्यामुळे चेन्नईची 10 षटकात 3 बाद 82 धावा अशी अवस्था झाली.

त्यानंतर अंबाती रायडू, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीही हे ठराविक अंतराने बाद होत गेल्याने चेन्नईची धावांची गती मंदावत गेली. अखेरच्या षटकांमध्ये सॅम करन आणि ब्राव्हो यांनी काही मोठे फटके मारल्याने चेन्नईला 188 धावांपर्यत मजल मारता आली. ब्राव्होने 8 चेंडूत 20 धावांची नाबाद खेळी केली. राजस्थानकडून चेतन साकारियाने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर ख्रिस मॉरिसने 2 विकेट घेत त्याला सुरेख साथ दिली.

धोनीचा @ 200

आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार म्हणून हा त्याचा 200वा सामना ठरला. चेन्नई संघाचे 200वेळा नेतृत्व करण्याचा मान त्याला मिळाला आहे. आजच्या दिवशी चेन्नईने 2008मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला होता. धोनीने आयपीएलमध्ये 177 सामन्यात, तर चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत 24 सामन्यात सीएसकेचे नेतृत्व केले आहे. मात्र चॅम्पियन लीग टी 20 च्या एका सामन्यात त्याने कर्णधारपद सुरेश रैनाकडे सोपवले होते. 2016-17 च्या हंगामात धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स संघाचे 30 सामन्यात नेतृत्व केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.