अनावश्यक वाहनांना बंदी; इनफ्रारेड थर्मामिटरने तपासणी
पोलिसांसह आरोग्य पथक सज्ज
पुणे – शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी (लॉकडाऊन) असताना अनेक वाहने शहरातून जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. मात्र, वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच ठिकाणी “चेक पोस्ट’ उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाकडून इनफ्रारेड थर्मामिटरने तपासणी केली जात आहे. अनावश्यक वाहनांना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 आरोग्य तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत, त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तीन शिफ्टमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे आणि प्राचार्य विश्वास सिद या दोघांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, भोर तालुक्यात प्रत्येकी दोन, शिरूरमध्ये एक आणि हवेलीमध्ये सात ठिकाणी तपासणी नाके करण्यात आले आहेत, त्यामुळे याभागातून प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे इनफ्रारेड थर्मामीटरने शारिरीक तापमान मोजले जाणार आहे.
तपासणी केल्यानंतर आवश्यकता भासल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाशी तात्काळ संपर्क केला जाणार आहे. याशिवाय स्थानिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून वाहनाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. ज्या-ज्या कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांना गैरहजर अथवा रजा घेता येणार नसल्याचे देखील जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या सर्व सिमारेषा बंद असून काही व्यक्ती शहरातून ग्रामीण भागात किंवा मुळशीमार्गे कोकण-मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कोकणात जाण्यासाठी भुगावहून मुळशी मार्गे पुढे जाणाऱ्या वाहनांना जिल्ह्याची हद्द सुरू होत असलेल्या भूगावमध्येच थांबविले जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, विनाकारण बाहेर पडलेल्या किंवा ठोस कारण नसलेल्या व्यक्तींना पुन्हा माघारी पाठविले जात आहे. यासाठी पौड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. देशमुख याच्यासह पोलीस कर्मचारी तुषार भोईटे, भरत शेडगे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
20 ठिकाणी तपासणी नाके…
हिंजवडी, ताम्हिणी, सोमाटणे, लोणावळा, चिंबळी, मोई, माळशेज, आळेफाटा, शिरूर, देहू, खेडशिवापूर, कदम वाकवस्ती, वडकी, वाघोली, नांदेड, कोंडवे-धावडे, वेळू, सारोळा, भूगाव, सूस.