उपजिल्हाधिकाऱ्यांची सूचना
पुणे – राज्यशासनाकडून येत्या 23 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांच्या करोनाची “आरटी पीसीआर’ तपासणी करून घ्यावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद यांना केली आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी दि. 17 ते 22 नोव्हेंबरदरम्यान नववी ते बारावीच्या शाळांना शिकवणाऱ्या शिक्षकांची शासकीय केंद्रात मोफत करोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेचे काटेकोर पालन करावे.
प्रामुख्याने सॅनिटायझर, थर्मल गन, पल्स ऑक्सीमिटर याची खरेदी करून, शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची, शिक्षकाची आणि कर्मचाऱ्यांची नियमीत तपासणी करावी.
दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुरू झाल्यानंतर संबंधित शाळांनी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी, याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन व्हावे.