संजोग वाघेरे यांचे प्रतिपादन : अरुण लाड यांच्या प्रचारार्थ पिंपरीत बैठक
पिंपरी – पुणे पदवीधर मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या विचारसरणीचा मतदारसंघ आहे. गतवेळी मोदी लाटेमुळे अत्यंत कमी मताने आपला पराभव झाला होता. यावेळी या मतदारसंघात परिवर्तन अटळ असून राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन अरुण लाड यांना विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रचारयंत्रणा राबविण्याबरोबरच अधिकाधिक मतदान करून घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाघेरे बोलत होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचे चिरंजिव शरद लाड, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, अजित गव्हाणे, मंगला कदम यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना वाघेरे म्हणाले, पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे ते उमेदवार असल्याने सर्वच पक्षातील कार्यकर्ते व तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून घेण्याची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे.
शरद लाड म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधरचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. गतवेळी केवळ 15 टक्के मतदान झाले होते. यावेळी जास्तीत जास्त मतदान करून घेण्याची आवश्यकता आहे. मतदारसंघात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरमधून आपल्याला मोठा पाठिंबा मिळत असून घटक पक्षातील सर्वांना एकत्र करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून अधिकाधिक मतदान झाल्यास विजय नक्की आहे.