मंचर – करोना काळात महिलेला कोविडची लागण होऊन तिचा मृत्यू झाल्याचा बनाव करून तिचा खोटा मृत्यूचा दाखला तयार केला. तो मंचर येथील कुलस्वामी पतसंस्थेत देऊन तिच्या खात्यावरील पैसे रोजी काढून घेत तिची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दाखला बनवणाऱ्या ग्रामसेवकसह तिच्या सासरच्या तब्बल सात जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश घोडेगाव न्यायालयाने दिले आहे.
याबाबत आशा गीताराम पोखरकर (वय 33, रा. मानकर वस्ती, पेठ पारगाव तर्फे खेड, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गीताराम आबाजी पोखरकर (वय 38), आबाची लक्ष्मण पोखरकर (वय 65), ठकुबाई आबाजी पोखरकर (वय 60), गजानन आबाजी पोखरकर (वय 42) शांताबाई बाळू नवले (वय 44, सर्व रा. पिंपळगाव),
ग्रामसेवक के. डी. भोगाळे (वय 47) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशा पोखरकर यांचा विवाह गीताराम याच्याशी 25/5/2005 रोजी झाला होता. विवाहानंतर काही वर्षांनी फिर्यादीचे पती दारू पिऊन घरी येउन फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करत होते. सासरे आबाजी पोखरकर, सासु ठकुबाई पोखरकर, दीर गजानन पोखरकर, नंनद शांताबाई नवले हे देखील त्रास देत होते.
10/5/2021 रोजी घरातील किरकोळ कारणावरून सासरच्यांनी मारहाण करून तिला घरातून बाहेर काढले. तेव्हापासून आशा ही माहेरी पेठ पारगाव येथे राहत आहे. यानंतर सासरच्यांनी आशा पोखरकर यांना करोना आजाराची लागण होऊन तिचा मृत्यू झाला आहे, असे दाखवले. तसा खोटा दाखला बनवून तो दाखला कुलस्वामी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा मंचर या बॅंकेत दाखवून फिर्यादीच्या खात्यावरील 39 हजार 615 रुपये ही रक्कम काढून घेतली.