पिंपळवंडी -पुणे जिल्ह्यातील उंब्रज नं.2 (ता. जुन्नर) येथील रस्त्याच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे व राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके भिडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घडलेल्या घटनेमुळे काही काळ तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उंब्रज येथील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 4) रस्त्याच्या विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मंचावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भर कार्यक्रमात शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आमदार अतुल बेनके यांना उद्देशून “आपले कर्तृत्व किती, आपण बोलतो किती’ अशा प्रकारची शाब्दीक बाचाबाची झाली.
त्यामुळे गावकऱ्यांनी कोणाची बाजू घ्यावी याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले व माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या मध्यस्थीने हे वातावरण निवळले. आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरद सोनवणे या तिघांच्याही हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ओतूर पोलीस ठाण्याच्या वतीने पिंजरा गाडीसह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे चित्र पहायला मिळाले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती विशाल तांबे, शिवसेना नेते शरद चौधरी, मंगेश काकडे, युवा नेते अमित बेनके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींना हे शोभते का?
जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडी नावालाच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील 36चा आकडा सर्वश्रुत आहेच; पण नागरिकांच्या कररुपी जमा होणाऱ्या पैशांवरून विकासकामे होते असातात हे जुन्नरचे आजी-माजी लोकप्रतिनिधी विसरले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कामांचे भूमिपूजन, शुभारंभाप्रसंगी श्रेयवादासाठीच हे लोकप्रतिनिधी पुढे येततात. केवळ निधी मंजूर केल्यानंतर पाठ थोपटून घेतात; मात्र पाच वर्षांची कारकिर्द संपली तरी ते काम झालेले नसते मग केवळ निधी मंजूर केल्यानंतर पाठ का थोपटून घेतात? त्यात विकासकामांच्या कार्यक्रमात असे भिडणे लोकप्रतिनिधींना शोभते का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
बेल्हे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम माजी आमदार वल्लभ बेनके यांनी मंजुर केले होते.त्या कामात मी काही सुधारणा करून भूमिपूजनासाठी माजी शशिकांत सुतार यांना आणले होते. उंब्रज येथील सबस्टेशन कामाच्या उद्घाटनासाठी अजित पवार आले होते. त्यामुळे आघाडी सरकार असल्यामुळे आपण एकत्रीतपणे कामे करावीत.
– बाळासाहेब दांगट, माजी आमदार जुन्नर