नवी दिल्ली : देशात स्वस्त सोने खरेदीचा पुन्हा एकदा धमाका सुरु होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देण्यात येत आहे. हे सोनं तुम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकणार आहात. ग्राहकांना सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत स्वस्तात सोने खरेदी करता येते. आरबीआयने आर्थिक वर्ष 2023-24 साठी सॉव्हरिन गोल्ड बाँडची दुसरी सीरिज जारी केली आहे.
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेंतर्गत स्वस्त सोने खरेदीसाठी पाच दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीम 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असेल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ग्राहकांना सॉव्हरिन गोल्ड बाँड खरेदी करता येणार आहे. सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते.
8 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या दुसऱ्या सीरिजसाठी इश्यू किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. तुम्ही प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन 99.9 टक्के शुद्ध सोने खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाईल. यामुळे किंमत कमी होऊन 5,873 रुपये प्रति ग्रॅम होईल.
या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक केल्यास, लोकांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर 2.50 टक्के व्याज दिलं जाईल. सॉवरेन गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षांचा आहे आणि पाच वर्षांनंतर, ग्राहकांना निवड रद्द करण्याचा पर्याय असेल. त्यासोबतच जर तुम्हाला या योजनेत बाँड खरेदी करायचे असतील तर गुंतवणूकदार हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड , पोस्टऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज , NSE आणि BSE च्या माध्यमातून खरेदी करु शकता. दरम्यान, लहान वित्त बँक आणि पेमेंट बँकेत याची विक्री होत नाही.