“चांदणी चौक’ भूसंपादन लटकलेलेच!

तब्बल 48 प्रकरणांबाबत निर्णय नाही : आतापर्यंत 32 जणांचे प्रस्ताव “क्‍लिअर’
पुणे –
नियोजित चांदणी चौक उड्डाणपुलासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाचा तिढा कायम असून, 48 प्रकरणांबाबत अद्याप निर्णयच घेण्यात येऊ शकला नाही. एकूण 80 जणांपैकी केवळ 32 जणांचेच प्रस्ताव “क्‍लिअर’ करण्यात आले आहे. चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी 13 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता आहे. सरकारी मालकीच्या जागा सोडल्या तर सुमारे 68 सदनिका आणि काही बंगले याप्रकल्पासाठी बाधित होणार आहेत.

महापालिकेतर्फे त्यांना मोबदला देण्यात येणार आहे. मात्र मोबदल्यासाठी आणि जागा ताब्यात घेण्यासाठी जे 80 प्रस्ताव आले आहेत त्यातील केवळ 32 प्रस्तावच कायदेशीर प्रक्रियेत पास झाले असून अद्याप 48 प्रकरणांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. महापालिकेकडे मोबदल्यासाठी सबमिट झालेल्या प्रकरणांतील 32 प्रकरणांना विधी विभागाकडून “क्‍लिअरन्स’ मिळाला आहे. त्यातील 18 प्रकरणात मोबदलाही देण्यात आला आहे. मात्र अन्य 48 प्रकरणांमध्ये 16 प्रकरणे कायद्याच्या कचाट्यात अडकली आहेत तर तीन प्रकरणांमध्ये न्यायालयात केस सुरू आहे.

तसेच यातील काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांचीच पूर्तता न केल्याने त्या प्रकरणांवर महापालिकेने काहीच निर्णय घेतला नाही. संबंधित जागा मालकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात कळवले आहे. जो पर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत या जागा ताब्यातच घेता येणार नाहीत. आधीच या उड्डाणपूलाने बरीच सरकारदरबारची अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. मात्र आता मूळ भूसंपादनाच्या मुद्‌द्‌यावरच हे अडकले आहे.

या भूसंपादनासाठी राज्य सरकारने 185 कोटी रुपये दिले आहेत. त्यातून प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. मात्र ज्या जागा ताब्यात घ्यायच्या आहेत त्याचे टायटल क्‍लिअर असणेही आवश्‍यक आहे. एखाद्या वारसदाराने किंवा जमीन मालकाने दावा दाखल केल्यास त्याची किंमत महापालिकेला मोजावी लागणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या जमिनी ताब्यात घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम अनिश्‍चित कालावधीसाठी रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.