पिंपरी – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून ऊन पडत आहे. पुढील काही दिवस या भागात ढगाळ हवामान राहणार असून, स्कायमेट वेदरने आठवडा अखेरीस शहरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, वातावरणातील उकाडा वाढत असल्याने, नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुुरुवात झाली आहे. गेली दोन-तीन दिवस शहराच्या विविध भागांत पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही भागांत मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते.
स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार, शनिवार (दि.3) ते बुधवार (दि.7) असे एकूण चार दिवस पाऊस शहरात हजेरी लावणार होता. तसेच 13 व 14 ऑक्टोबरला पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.
मात्र, परतीच्या पावसाच्या मार्गात झालेल्या वातावरणातील बदलामुळे याकालावधीत पाच दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, केवळ शनिवारी (दि.10) शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. यंदा मॉन्सूनच्या परतीचा प्रवास लांबल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही शहरात विविध ठिकाणी परतीचा पाऊस हजेरी लावत आहे.