पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची तीन सदस्यीय अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी महापालिका निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. 2, 3, 5, 7, 11, 12, 26, 27 या आठ प्रभागात काही बदल झाले आहेत. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा सांगवीचा शेवटचा प्रभाग असणार आहे. यामध्ये भोसरीतील प्रभाग क्रमांक 7 आळंदी रोड, चक्रपाणी वसाहत हा सर्वाधिक म्हणजेच 42 हजार 251 लोकसंख्येचा तर, प्रभाग क्रमांक 2, चिखली गावठाण, मोरेवस्ती हा सर्वांत कमी म्हणजेच 32 हजार 161 लोकसंख्येचा प्रभाग ठरला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी 22 तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव आहेत. 114 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11 ने वाढ झाल्याने आता 139 झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 139 सदस्यांच्या महापालिका सभागृहात 22 सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी 11 असेल. लोकसंख्येनुसार 22 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव राहणार आहेत.
कोणते प्रभाग आरक्षित होतात, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी तीन प्रभाग आरक्षित असतील.
प्रभागाची किमान लोकसंख्या 32 हजार तर कमाल लोकसंख्या 42 हजार अशी आहे. भोसरीतील प्रभाग क्रमांक 7 आळंदी रोड, चक्रपाणी वसाहत हा सर्वाधिक 42 हजार 251 लोकसंख्येचा तर, सर्वांत कमी प्रभाग क्रमांक 2-चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडीची 32 हजार 161 हजार लोकसंख्या आहे.
लोकसंख्या (2011) – 17 लाख 27 हजार 692
अनुसूचित जातीची लोकसंख्या : 2 लाख 73 हजार 810 (15.84टक्के)
अनुसूचित जातीसाठी आरक्षण 16 टक्के : एकूण 22 जागा (पैकी 11 महिला)
अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग : 11, 14, 16, 17, 18, 19, 20, 22, 25, 29, 33, 37, 38,29, 32, 34, 35, 39, 41, 43, 44, 46
अनुसूचित जमातीची लोकसंख्या : 36 हजार 535 (2.11 टक्के)
अनुसूचित जमातीसाठी आरक्षण 3 टक्के : 3 जागा (पैकी 2 महिला)
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग : 41, 5 आणि 6
सर्वसाधारण प्रभाग : 114 (पैकी 57 महिला)
एकूण नगरसेवक संख्या : 139