मध्य महाराष्ट्र पुन्हा तापणार

पुढील आठवड्यात पुन्हा उन्हाचा कडाका


हवामान विभागाच्या अंदाजाने पोटात गोळा

पुणे – “फणी’ चक्रीवादळामुळे राज्यात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. त्यामुळे मागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यातील उन्हाची तीव्रताही कमी झाली. परंतू, आता “फणी’ चक्रीवादळ बांगलादेशकडे वळाले. त्याचा परिणाम राज्यात जाणवू लागला असून, रविवारी (दि.5) दिवसभरात काही शहरांमधील कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाली. दरम्यान, पुढील चार दिवसात मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाडा पुन्हा तापणार असल्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील काही भागात लक्षणीय घट झाली. यंदा मध्य महाराष्ट्राने 45 अंश सेल्सिअस कमाल तापमानापर्यंत मजल मारली. मात्र, फणी चक्रीवादळामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे बहुतांश शहरातील कमाल तापमान 35 अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी अशा वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला.

दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक ब्रह्मपुरी येथे 44.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुणे शहरातील कमाल तापमान 36.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. शहरात दोन दिवसांपासून हवेत गारवा असल्यामुळे नागरिक सुखावले आहेत. परंतू, पुढील तीन ते चार दिवसात शहरातील कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे जाण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविल्यामुळे “मे’ महिन्याचा चटका सुरू होणार? असल्याचे संकेत मिळत आहे.

राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
ब्रह्मपुरी 44.9, चंद्रपूर 44.2, नागपूर 43.5, वर्धा 43, परभणी 42.1, अकोला 41.8, यवतमाळ 41.5, वाशिम 41.4, जळगाव 41, सोलापूर 40.1, गोंदिया 40.4, बीड 40.6, उस्मानाबाद 38.7, औरंगाबाद 38.6, बुलढाणा 38.2, सांगली 37.7, पुणे 36.7, नाशिक 36.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.