पिंपरी – “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सर्वेक्षण मोहिमेतून प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक सक्षमतेने उपाययोजना राबविणे शक्य होणार आहे. भविष्यातील करोनाच्या आजाराचा प्रसार विचारात घेता, त्यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन वेळेत करणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाचे प्रमुख आणि नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अरविंद सिंग कुशवाहा यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाने पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड-19 अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी करत उपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा देखील या पथकाने घेतला. डॉ. कुशवाहा यांचे समवेत नागपूरच्या एम्सचे डॉ. एस. बॅनर्जी होते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सद्यःस्थितीबद्दल माहिती दिली.
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरला पथकाने भेट देऊन तेथील यंत्रणेची माहिती घेतली. डॉ. संदेश कपाले यांनी या सेंटरच्या कामकाजाची माहिती दिली. या सेंटरच्या कामाबाबत डॉ. कुशवाहा यांनी समाधान व्यक्त केले. करोना आजाराने बाधित झालेल्या रुग्णांवर याठिकाणी उपचार केल्यानंतर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा डॉ. कुशवाहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सदृढ आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर पथकाने वायसीएमला भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली.
या वेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उप आयुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, वायसीएमचे डॉ. सुनील पवार, डॉ. परमानंद चव्हाण आदी उपस्थित होते.