स्टॉकहोम – अमेरिकेतील कवयित्री ल्युईस ग्लुक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पष्ट आणि बिनधास्त साहित्य रचनेसाठी ग्लुक यांची या प्रथितयश पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेतील बॉब डायलन यांना 2016 साली साहित्यातील नोबेलने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यानंतर पुन्हा एकदा साहित्यातील नोबेल मिळवण्याचा मान अमेरिकेला मिळाला आहे.
ग्लुक यांनी केलेल्या काव्यमय साहित्यातून अत्यंत सर्वसामान्यांनाही वैश्विक पातळीवर नेऊन ठेवले आहे, असे नोबेल पुरस्कार जाहीर करणाऱ्या कमिटीने म्हटले आहे. नोबेल पुरस्कारासाठीच्या स्वीडिश ऍकेडमीचे कायम सचिव मॅटस माल्म यांनी आज स्टॉकहॉम येथे या पुरस्काराची माहिती दिली.
न्यूयॉर्कमध्ये जन्म झलेल्या 77 वर्षीय ल्युईस ग्लुक या येल विद्यापीठामध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी 1968 साली फर्स्टबॉर्न या कवितासंग्रहाद्वारे आपल्या लेखनाला प्रारंभ केला. लवकरच अमेरिकेतील समकालीन साहित्यिकांमध्ये त्या प्रस्थापित झाल्या.
लेखनशैलीच्या अभ्यासासाठी ग्लुक यांच्या 12 कवितासंग्रहांना निवडण्यात आले. त्यामध्ये डिसेंडिंग फिगर, द ट्रीम्प ऑफ आचिल्स ऍन्ड अरारात यांचा समावेश असल्याचे साहित्यातील नोबेल पुरस्काराच्या निवडीसाठी नियुक्त समितीचे अध्यक्ष ऍन्डर्स ओल्सोन यांनी सांगितले.
ग्लुक यांच्या कवितांमध्ये नेहमी श्रेष्ठ दर्जाचा प्रभाव आणि कौटुंबिक आयुष्याची छटा दिसते, असेही ओल्सोन यांनी सांगितले.
ग्लुक यांच्या 2006 सालच्या ऍव्हेर्नो या कवितासंग्रहात मृत्यूदेवता हॅडसच्या ताब्यातील पर्सफोनचा नरकात घसरण्याच्या कल्पनेला नोबेल ऍकेडमीने सर्वोत्कृष्ट संबोधले आहे.