पिंपरी – सेलिब्रिटींची यंदाची दिवाळी ही सुरेल ठरत आहे. करोनामुळे गेल्या पावणेदोन वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रम, दिवाळी पहाट, नाट्यप्रयोग आदींपासून वंचित असलेल्या सेलिब्रिटींनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्याकडे त्यांनी लक्ष दिले आहे. दिवाळीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतानाच कुटुंबीयांसमवेत वेळ घालविण्यावर देखील त्यांचा भर आहे.
सावनी रवींद्र (गायिका) -यंदाची दिवाळी माझ्यासाठी तीन कारणांमुळे महत्त्वपूर्ण आहे. माझ्या दोन महिन्यांच्या मुलीसोबत यंदा मी दिवाळी साजरी करते आहे. एका अर्थाने मातृत्त्व सेलिब्रेट करते आहे. त्याशिवाय, नुकताच मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचा आनंद वेगळाच आहे. दिवाळी पहाटचे कार्यक्रम जवळपास दोन वर्षानंतर सुरू झाले आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी माझे कार्यक्रम होत आहेत. मी त्यासाठी उत्सुक आहे.
कुटुंबीयांसमवेत त्यामुळे मला जास्त वेळ देता येणार नाही. मात्र, रसिकांची दिवाळी सुरेल करता येणार आहे, त्याचा आनंद आहे. स्मिता तांबे (अभिनेत्री) :दिवाळीत मी कुटुंबांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालविते. विविध खेळ खेळणे, फराळाचे पदार्थ बनविणे यावर माझा भर असतो. दिवाळीला खरेदीचाही उत्साह असतो.
नवीन कपडे आवर्जून घेतले जातात. भाऊबीजेला भावाकडे जाते. माझी दोन महिन्यांची मुलगी आहे. तिच्यासोबतची यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप “स्पेशल’ आहे. मी दिवाळीत फटाके उडवित नाही. मात्र, घरासमोर आखीवरेखीव रांगोळी काढायला मला आवडते.
डॉ. संजीवकुमार पाटील (अभिनेते) – दिवाळीत सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करणे, दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना कुटुंबासह आवर्जून हजेरी लावणे, फराळ खाण्याचा आनंद लुटणे या गोष्टी मी आवर्जून करतो. अशा छोट्या-छोट्या क्षणांतून आपण जीवनातला आनंद वेचायला हवा. कपडे खरेदी केली जाते. बहिणी भाऊबीजेला एकत्र येतात.
त्यामुळे कौटुंबिक स्नेहमेळा जमतो. मी दिवाळीत फटाके उडविणे टाळत आलो आहे. चित्रपट, वेबसीरीज आणि मालिका असा माझा अभिनय प्रवास सुरू आहे. मालिकांचे चित्रीकरण शहरात सुरू व्हावे, अशी मनोमन इच्छा आहे. त्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू आहेत.
सायली सांभारे (गायिका व अभिनेत्री) -यंदा दिवाळी पहाटचे कार्यक्रम सुरू झाल्याने सुरांच्या साथीने दिवाळी साजरी करण्यास मिळत आहे. त्याचा आनंद अवर्णनीय आहे. दिव्यांच्या प्रकाशात आणि विद्युत रोषणाईने आमचे अवघे घर उजळून निघाले आहे. कुटुंबीयांसाठी आवश्यक खरेदी, फराळाचे विविध पदार्थ स्वत: बनविणे याकडे मी जातीने लक्ष देत आहे. सध्या विविध मालिका,लघुपट यामध्ये काम करत आहे.