लखनौ – देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थींचे आज उत्तराखंडमधील हरिद्वार येथे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण देशाने जनरल बिपिन रावत आणि त्यांच्यासोबत शहीद झालेल्या 11 अधिकाऱ्यांना ओल्या डोळ्यांनी निरोप दिला. अशा परिस्थितीत कानपूर देहात भाजपचे आमदार विनोद कटियार यांचा बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते शहीदांना श्रद्धांजली वाहताना हसत असल्याचे दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना माजी IAS सूर्य प्रताप सिंह यांनी लिहिले आहे की, काल एका नशेडी पत्रकाराची श्रद्धांजली पाहिली. आज कानपूरचे भाजप आमदार विनोद कटियार यांची खळखळून हसतानाची श्रद्धांजली पहा. यांसह अनेक जणांनी ट्वीटरवर फोटो शेअर करून आमदार विनोद कटियार यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. दुसऱ्या एका ट्वीटर वापरकर्ते मुलायम सिंह यादव यांनी फोटो पाहून हा आमदाराचा राष्ट्रवाद आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1469364279144947726
दरम्यान, न्यूज नेशनचे अँकर दीपक चौरसिया यांचाही एक बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लाईव्ह शोमध्ये अॅंकरिंग करत असताना ते तोतऱ्या आवाजात अस्ताव्यस्तपणे बोलताना दिसले. जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी रावत यांना जर्नलिस्ट बिपीन रावत म्हटले तर एकदा जनरल व्ही के सिंह म्हंटले. या प्रकारानानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अनेकांनी ट्वीट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर आता चौरसिया यांना शोमधून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.