मुंबई – भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. देशभरातून सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते आपण कोणाबद्दल बोलतोय हेच विसरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, श्रद्धांजली वाहण्यासाठी सदावर्ते यांनी माईक घेतला.. उपस्थितांना आपण अभिवादन करणार आहोत, श्रद्धांजली वाहणार आहोत.. ज्यांच्या तोंडामध्ये सुपारी-तंबाखू असेल त्यांनी थुंकून टाकायची आहे असे सांगितले. त्यानंतर सावधान, विश्राम परेड करण्यात आले. त्यानंतर मागे असलेल्या कार्यकर्त्याला काय नाव होतं त्यांच? कोण होते ते? असे दोन वेळा विचारले. मागच्या कार्यकर्त्यांने जनरल बिपीन रावत यांचे नाव घेतल्यानंतर सदावर्तेंनी पुन्हा त्यांना विचारलं की ‘कोण आहेत ते?’ मग मागच्या कार्यकर्त्यांने त्यांना पुन्हा सांगितलं की जनरल बिपीन रावत हे तिन्ही सेना दलाचे प्रमुख आहेत. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी आपले भाषण सुरु केले.
एखादा व्यक्ती सभेमध्ये बोलताना नाव विसरतो, किंवा संबंधित व्यक्तीची माहिती विसरतो असे अनेकदा घडलेले आहे. पण मोठ मोठी भाषणे देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते देशाच्या लष्कराच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याचे नाव विसरल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अॅड सदावर्ते यांना ट्रोल केले जात आहे. तसेच त्यांच्यावर अनेक प्रकारचे मीम्सही बनवण्यात येत आहेत.