नवी दिल्ली – कथित नव्या मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने केजरीवाल यांना रविवार, दि. 16 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश बजावले आहे. नवीन मद्य धोरण प्रकरणात सीबीआयला त्यांची चौकशी करायची असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी आठवडयाच्या सुरूवातीला सीबीआयकडून पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आज सन्मस बजाविण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांना 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत.
केजरीवाल यांना अटक करण्याचा कट-आप
अदानी प्रकरणी बोलल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावले. त्यामागे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आहे, असा आरोप आपने केला. सीबीआयने समन्स बजावल्याच्या घडामोडीनंतर आपचे नेते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.