भोर – भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटातील भोर व महाड हद्दीतील काही ठिकाणी पडलेल्या दरडी अद्यापही हटविण्यात आलेल्या नाहीत. दोन ठिकाणी मोरी व संरक्षक भिंतीचे काम अपुर्ण आहे. गटारे साफ केलेली नाहीत. दगड माती पडलेली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या अपुऱ्या कामामुळे पावसाळ्यात वरंधा घाटात अपघात होण्याची शक्यता आहे.
घाट बंद होण्याची भितीही आहे. त्यामुळे घाटात रस्त्यावरील संरक्षक भिंत, मोरी तसेच दरडीची कामे पूर्ण करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होत आहे. भोर तालुक्यातून कोकणात जाणारा जवळचा मार्ग म्हणजे भोर- महाड रस्ता आहे. या मार्गावर पावसाळ्यात २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हिडशी, वारखंड, कारुंगण, शिरगाव, उंबार्डेवाडी व उंबार्डे गावाच्या हद्दीत अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. पूल वाहून गेले. संरक्षण भिंत पडल्यामुळे रस्ता वाहतुकीस बंद होता तर महाड तालुक्याच्या हद्दीत ५ ते ६ ठिकाणी रस्ता वाहून गेला होता.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन-तीन ठिकाणी नवीन मोरी, संरक्षक भिंत बांधून रस्त्यावरील कारपेटचे कामही केले आहे. मात्र हिर्डोशी गावाजवळळ पडलेल्या दरडी दोन वर्षापासुन तशाच आहेत. उंबार्डेवाडी येथे रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने रस्ता अरुंद झालेला आहे. मगील दोन वर्षापासुन या ठिकाणी रस्ता धोकादायक झाला असुन पावसाळ्यात रस्ता खचुन वाहातुक बंद होण्याची भिती आहे.
तर या रस्त्यावर एक ठिकाणी मोरी वाहुन गेली आहे. ते काम झालेले नाही, त्यामुळे रस्ता तातपुरता वळवला आहे. मात्र पावसाळ्यात दरडी पडुन वाहातुक ठप्प होऊ शकते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान भोर-महाड रस्त्यावरील वारवंड गावाजवळील वाहून गेलेल्या मोरीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाळयात माती रस्त्यावर येते. या ठिकाणी फक्त पाईप टाकले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा माती चिखाल रस्त्यावर येऊ शकते. शिरगाव भोर हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावरील संरक्षक भिती लोखंडी रेलिग नाहीत त्यामुळे रात्रीच्यावेळी अपघात होऊ शकतो.
नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे ही कामे लवकर सुरु करण्याची मागणी पर्यटक व नागरिकांमधून होत आहे. मात्र पावसाळ्यापुर्वी कामे झाली नाहीत तर भोर महाड रस्त्यावरील वाहातुक ठप्प होऊ शकते.
भोर-महाड रस्त्यावरील डांबरीकरण कारपेट पुर्ण; मात्र मोरी, संरक्षक भिंत, दरडी अपूर्ण
भोर-महाड रस्त्यावरील शिंदेवाडी ते भोर-महाड हद्दीपर्यंत रस्त्यावर खड्डे पडलेल्या ठिकाणी कारपेट करुन खड्डे बुजवुन रस्ता चकाचक करण्यात आला आहे. मात्र रस्त्यावरील दरडी काढलेल्या नाहीत. रस्त्याच्या बाजूला गटारावर पडलेल्या दगडमाती काढलेली नाही. वरवंड गावाजवळ मोरी, उंबार्डेवाडी फाटयावर संरक्षक भिंत अपूर्ण तर एक ठिकाणी मोठी मोरी अपूर्ण आहे. याशिवाय वरंधा घाटातील वाघजाई मंदीरासमोरील संरक्षक भिंत अपूर्ण खराब झालेल्या तर वरंधा घाटातील महाड हद्ददीत दरडी, दगड गोटे पडलेल्या संरक्षक भिंत अपूर्ण आहेत. रस्त्यावर अनेक कामे झालेली नाहीत त्यामुळे रस्ता धोकादायक झाला आहे.
दरम्यान, भोर-महाड रस्त्यावरील अतिवृष्टीने पडलेल्या दरडी, खचलेला रस्ता, वाहून गेलेला पूल, संरक्षक भिंत, नवीन रस्ता व संपूर्ण रस्त्यावरील कारपेटची कामे झालेली आहेत. एक ठिकाणी संरक्षक भिंत व एक मोरी अपुर्ण आहेत, ती पुढील महिन्यात पूर्ण होतील आणि रस्ता वाहातुकीस सुरळीत होईल, अशी माहिती भोर सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता संजय वागज यांनी दिली आहे.