नवी दिल्ली – राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्णा यांना हिमालय योगी म्हणून ई-मेल पाठविणारी व्यक्ती आनंद सुब्रमण्यन असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांचा हवाला देऊन काही वृत्त माध्यमांनी दिली आहे.
रामकृष्णा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आनंद सुब्रमण्यन त्यांचे सल्लागार आणि मुख्य कार्यपालन अधिकारी होते. या योगीच्या सूचनेवरून चित्रा रामकृष्णा यांनी आनंद सुब्रमण्यन यांची नियुक्ती केली होती. आनंद सुब्रमण्यन यांनी वेगळा ई -मेल आयडी करून त्या माध्यमातून मेल केल्या होत्या. गेल्या आठवड्यात सुब्रमण्यन यांची चौकशी केल्यानंतर सीबीआयने काल रात्री 11 वाजता सुब्रमण्यन यांना अटक केली आहे.
या हिमालय योगीला केलेल्या मेलमध्ये रामकृष्णा यांनी शेअर बाजारातील अंतर्गत माहिती लिक केली होती. त्यानंतर रामकृष्णा यांची अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने चौकशी केली आहे. सुब्रमण्यन यांची नियुक्ती बेकायदेशीररित्या करून त्यांना भलामोठा पगार देण्यात आल्याचे मत शेअर बाजार नियंत्रक सेबीने नोंदविले आहे.
शेअर बाजाराचे कामकाज चालविताना आणि महत्त्वाचे निर्णय घेताना रामकृष्णा या कथित हिमालय योगीचा सल्ला घेत होत्या असे रामकृष्णा यांनी सेबीच्या चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले होते.