जामखेड -तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळाचा ट्रक काळ्याबाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चापडगाव शिवारात जामखेड पोलिसांनी गुरुवारी पकडला. पोलिसांनी ट्रक चालकासह दोन जणांना अटक केली आहे.
सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी सोनेगाव, नान्नज, चोंडी, चापडगाव मार्गे जाणार आहे, अशी खबर पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना मिळाली होती. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक रवाना केले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास चोंडी शिवारात तांदूळाने भरलेला ट्रक (क्रमांक एम.एच.-45, टी.7396) काळ्या बाजाराने विक्रीसाठी गुजरातकडे निघाला होता.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस नाईक केशव व्हटकरे, भरत गडकर, आण्णासाहेब कोळेकर, संतोष साबळे, हृदय घोडके, आदित्य बेलेकर, सागर जंगम, लहू खरात यांच्या पथकाने हा ट्रक अडवला. ट्रक चालक शशिकांत भिमराव गवळी (रा. कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), सहायक चालक संदीप सुनील लोंढे (रा.बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा तांदूळ सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान चालक मंदा सुग्रीव वायकर यांचा असून तो गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांनी या घटनेबाबत तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर जामखेड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.