तलाव खोलीकरणातील भरावामुळे नागरिकांच्या जीवाला धोका

वाड्या-वस्त्यांना होतोय वीजपुरवठा : 22 हजार के.व्ही. उच्चदाबाच्या वाहिन्या

तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या तलावाच्या खोलीकरण व सुशोभीकरण कामाचा निघालेला मुरूम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खांब आणि तारा गाडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तळेगाव दाभाडे पारेषणचे विद्युत उपकेंद्र असून, या विद्युत खांबातून 22 हजार उच्च दाबाचा पुरवठा होत आहे. तळेगाव दाभाडे, सोमाटणे, वडगाव, कामशेत, आंदर मावळ तसेच मावळ तालुक्‍यातील गाव, वाड्या व वस्त्यांमध्ये विद्युत पुरवठा केला जात आहे.

नगरपरिषदेच्या तलावाचे खोलीकरण, सुशोभीकरण करण्यासाठी जेसीबी, पोकलॉन व डंपरच्या साहाय्याने मुरूम काढून परिसरात टाकला जात आहे. वाढत्या भरावामुळे विद्युत खांब आणि तारा गाडण्याचे काम केले आहे. यामुळे विद्युत वाहिनीच्या खालून जनावरे अथवा नागरिक गेल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडून चार विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे अंदाजपत्रक विद्युत वितरण कंपनीकडून केले आहे. त्याचे काम सुरू न करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूमाचा भराव टाकल्याने विद्युत खांब अर्धे गाडले गेले आहेत. या भागात भविष्यात जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. या भरवामुळे अनेक वीज खांब गंजले असून, काही खांब पडले होते. सुदैवाने त्याठिकाणी जीवितहानी झाली नाही.

या परिसरात पथदिवे नसल्याने परिसर अंधारमय असतो. याठिकाणी रात्री लुटमारीच्या घटना घडतात. नगरपरिषदेच्या तलाव खोलीकरण व सुशोभीकरणाच्या कामाचे मावळ तालुक्‍यात कौतुक होत असताना त्या कामापासून वीज खांब आणि विद्युत तारांपासून धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने प्रथम भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पूर्ण करूनच उर्वरित खोलीकरणातून निघालेला मुरूम टाकावा. अन्यथा जीवितहानी झाल्यावर नगरपरिषदेची जबाबदारी असेल, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सोमा भेगडे, सुनील भोंगाडे, आशिष खांडगे यांनी केली आहे.

नगरपरिषदेच्या तलाव परिसरातून मावळ तालुक्‍यातील गाव, वाड्या व वस्त्यांमध्ये उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आहेत. नगरपरिषदेने या चार विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे अंदाजपत्रक विद्युत वितरण कंपनीकडून केले आहे. त्याचे काम सुरू न करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूमचा भराव करून विद्युत खांब अर्धे गाडले गेले आहेत.

– राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, विद्युत पारेषण उपकेंद्र, तळेगाव दाभाडे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.