कोल्हापुरात 71, हातकणंगलेत 70 टक्के मतदान

रांगा लावून बजावला हक्क : मतदान यंत्रे बंद

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज मोठमोठ्या रांगा लावून ईर्षेने मतदान केले. दोन्ही मतदारसंघात काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना घडल्या परंतु प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून मतदान यंत्र सुरू केले. कोल्हापुरात 71 तर हातकणंगलेमध्ये 70 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणूकीत कोल्हापूरमध्ये 72 तर हातकणंगलेत 73 टक्के मतदान झाले होते.

कोल्हापूरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक विरुध्द शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तर हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी विरुध्द शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. दोन्ही मतदार संघात 72 ठिकाणी इव्हीएम यंत्रे बंद पडल्याने मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. तिथे लगेच नवीन यंत्र किंवा आहे तेच दुरुस्त करून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. 29 गावांतील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तर काही गावांनी बहिष्कार मागे घेत मतदान केले.

मुरगुडमध्ये दोन मतदान केंद्रावर मशीन बंद होते, त्यामुळे मतदान तब्बल एक तास उशिरा सुरु झाले, यामुळे केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. कसबा सांगाव येथे मतदान केंद्र क्र.40 वर सकाळी 7 वाजताच सुमारे अर्धा तास मशिन बंद पडले. माणगाव येथे तब्बल अधार्तासाने मशिन सुरू झाले. मतदान स्लिप मध्ये गोंधळ होता. नाव एकाचे फोटो एकाचा अशी स्थिती होती. शिरोळ तालुक्‍यातही अनेक केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.सेनापती कापशी, ता.कागल येथील मतदान केंद्र क्रमांक 228 वर मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. चुये ता. करवीर येथे सकाळी अर्धा तास मतदानयंत्र बंद झाल्यामुळे मतदानासाठी रांगा वाढल्या. कणेरी येथे 271 केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला. देवाळे, ता. करवीर येथील 30 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब, झाल्याने गोंधळ उडाला. येथील 327 मतदान केंद्रावरील यंत्र बंद पडल्याने एक तास मतदारांना ताटकळत बसावे लागले, पेठवडगाव येथे शारदा विद्या मंदीरमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला. गाडेगोंडवाडी, बाचणी ता. करवीर येथील मतदार यंत्रात बिघाड झाल्यानेही एक तास मतदान बंद होते. वेळ वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली परंतु वेळ वाढवून न देण्याचा निर्णय निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिला. गाडेगोंडवाडी ता. करवीर येथील 40 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. शिरोळमध्ये तांत्रिक बिघाडामुळे 38 ठिकाणी ईव्हीएम मशिन बदलण्यात आले, तर इचलकरंजीत 4 यंत्रे बदलण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.