मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांकडून (Amruta Fadnavis) खंडणी वसुली प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी बुकी अनिल जयसिंघानीला (Bookie Anil Jaisinghani) जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. बुकी अनिल जयसिंघानी हा 20 मार्चपासून अटकेत होता. जयसिंघानीची मुलगी आणि भाऊ या सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजेरी लावण्याचे आणि साक्षीदारांना न धमकावण्याचे निर्देश न्यायालयाने जयसिंघानीला दिले आहेत. अनिल जयसिंघानीवर मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता.
दरम्यान, क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर ईडीन मनी लॉंड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने केला असल्याचा आरोप आहे.