पिंपरी – कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता परस्पर गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले. त्यानंतर बॅंकेचे हप्ते न भरल्याने बंगल्याचा लिलाव झाला. या लिलावात अशिष गावडे यांनी हा बंगला बॅंकेकडून विकत घेतला. मात्र, ही माझ्या सासऱ्यांची मालमत्ता असल्याचे सांगत भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे आणि त्यांचे पती वसंत गावडे यांनी परत बंगल्यात घुसखोरी करीत दमदाटीही केली. याप्रकरणी त्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष मोरेश्वर गावडे (वय 31, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जयश्री वसंत गावडे आणि त्यांचे पती वसंत धोंडीबा गावडे (रा. गावडे पार्क, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आशिष यांचे आजोबा धोंडिया गावडे यांनी हा बंगला 25 वर्षापूर्वी फिर्यादी यांची आई आणि चुलते वसंत गावडे या दोघांच्या नावावर केला होता. मात्र चुलते वसंत गावडे यांनी परस्पर बंगला गहाण ठेवून बॅंकेकडून 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले. तसेच वसंत गावडे यांनी सदरचा बंगला कुलमुत्यारपत्राच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
वडिलोपार्जित बंगला असल्याने कर्ज फेडण्याबाबत फिर्यादी यांनी चुलते वसंत गावडे यांना विचारले असता बंगल्याच्या किमतीपेक्षा कर्ज आणि व्याजाची रक्कम जादा असल्याने बंगला सोडविणार नाही. तसेच कर्ज फेडण्यासाठी मदतही करणार नाही, असे फिर्यादी यांना सांगितले. बॅंकेने त्या बंगल्याचा लिलाव जाहीर केला. फिर्यादी आशिष यांनी दोन कोटी 61 लाख रुपयांना बंगला लिलावात विकत घेतला.
बॅंकेने तो बंगला फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि आईच्या नावावर करून दिला. यानंतर फिर्यादी हे त्या बंगल्यात राहण्यासाठी आले. 20 सप्टेंबर 2020 रोजी चुलते वसंत गावडे आणि जयश्री गावडे हे दोघेजण बंगल्यात आले. या दोघांनी फिर्यादींना धमकी देऊन आपण या बंगल्यात राहणार असल्याने सांगितले. व आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ अमित यास रोहित वसंत गावडे यांनी मारहाण करून अर्ध्या बंगल्याचा जबरदस्तीने ताबा घेतल्याचेही फिर्यादीमध्ये
म्हटले आहे.
तो बंगला आम्ही दीड कोटींचे कर्ज काढून त्यात आणखी रक्कम टाकून बांधला आहे. ते घर आमचेच असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आले आहे. आम्ही याबाबत पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार आहे.
– जयश्री गावडे, माजी नगरसेविका, पिंपरी-चिंचवड महापालिका