उंब्रज -जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीतील मसूर फाट्यावर युवकांच्या दोन गटांमध्ये काल (दि. 9) रात्री 8.30 च्या सुमारास मारामारी झाली. यामध्ये कोयता आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादींवरून 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हर्षद हणमंत माने (वय 20, रा. शिरवडे, ता. कराड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडणावरून तासवडे टोल नाक्यावर हर्षदची मयूर थोरात याच्याशी काल (दि. 9) सायंकाळी बाचाबाची झाली होती. भांडणे मिटवण्यासाठी हर्षद व त्याचा मित्र अदित्य शितोळे मसूर फाटा येथे आले. तेथे हृषिकेश माने उपस्थित होता. मी उंब्रज भागातील ऋषिभाई आहे, तुला माझी दहशत माहिती नाही का? माझेवर नऊ केसेस आहेत. मला कोणीही काही करू शकत नाही. भांडणे मिटवायची असतील, तर आम्हाला पैसे द्यावे लागतील.
आमचे दारुचे पैसे दे, असे म्हणून हृषिकेश माने व मयूर थोरात यांनी हर्षदला मारहाण करुन, त्याच्या पॅंटच्या खिशातील 2400 रुपये काढून घेतले. हृषिकेशने हर्षदच्या पाठीत दगड मारला. मंज्या नावाच्या युवकाने हर्षदच्य उजव्या पायावर दगड मारला. संग्राम थोरात, गण्या यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दहशत निर्माण केली. यावेळी भांडणे सोडवायला आलेला हर्षदचा भाऊ संकेतलाही मारहाण करण्यात आली. यावरून हृषिकेश दादासाहेब माने (रा. चरेगाव, ता. कराड), मंज्या (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कोर्टी, ता. कराड), मयूर शंकर थोरात (रा. कळंत्रेवाडी, ता. कराड), संग्राम थोरात (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कोर्टी, ता. कराड), गण्या थोरात (पूर्ण नाव व गाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हृषिकेश माने (वय 23) याच्या फिर्यादीनुसार, शिवडेतील बिअर बारच्यासमोर हृषिकेशचा मावसभाऊ मयूर शंकर थोरात आणि हर्षद माने हे कंपनीत झालेल्या जुन्या भांडणाबाबत बोलत होते. त्यावेळी तीन-चार जण अचानक तेथे आले. आदित्य दादासाहेब शितोळे हृषिकेशला म्हणाला की, तुला मस्ती आली आहे. तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्याने हृषिकेशवर कोयत्याने वार केला, तर हर्षद मानेने डोक्यात दगड मारला. इतर तीन-चार युवकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. यावरून हर्षद माने (रा. शिरवडे), आदित्य शितोळे (रा. अंधारवाडी, ता. कराड) आणि तीन ते चार अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.