- प्रवाशांचा अल्प प्रतिसाद : लोणावळ्यात 18, तर मळवलीत अवघे चार प्रवासी
- दिवसातून तीन फेऱ्या केल्यानंतर होऊ शकतो प्रवाशांना फायदा
कार्ला – सकाळी 8.20 वाजता अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी सात महिन्यांनतर आज सोमवारी (दि. 12) लोणावळा रेल्वेस्थानकावरून अठरा तर मळवली स्टेशनवरुन चार प्रवासी घेऊन पुण्याकडे रवाना झाली. करोना साथीचा रोग देशात आल्यानंतर मार्च महिन्यांत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. तेव्हापासून बंद असलेली लोणावळा-पुणे लोकल तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा रुळावर आली.
“अनलॉक’ पाचमध्ये राज्य शासनाने लोणावळा-पुणे लोकलला हिरवा कंदील दाखविल्यानंतर सर्व नियमावली तयार करीत आजपासून लोणावळा- पुणे लोकलसेवा केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. पोलीस पडताळणीचा “क्युआर कोड’ व शासकीय सेवेत असल्याचे ओळखपत्र तपासून आज प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात आला.
सकाळच्या सत्रात एक व सायंकाळी एक लोकल पुण्याहून लोणावळा व लोणावळ्याहून पुण्याला जाणार आहे. लोणावळा स्थानकावरून सोमवारी पहिली लोकल पुण्याकरिता धावणार असल्याने प्रशासनाकडून योग्य तयारी करण्यात आली होती. लोकल चालक मधुकर राऊत यांनी सोमवारच्या पहिल्या फेरीचे सारथ्य केले. ज्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्या सर्व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेचे अधिकारी काशिनाथ पडवळ यांनी केले.
लोकलसेवेचा पहिलाच दिवस असल्याने शासकीय कर्मचारी प्रवास संख्या कमी आहे. “क्युआर कोड’ मिळाल्यानंतर संख्येत वाढ होईल. नागरिकांनी देखील मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून प्रवास करावा, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काही प्रवाशांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सध्याची लोकल सुविधा ही केवळ जनरल ड्युटी कामगारांसाठी आहे. शासकीय ड्युटी तीन शिफ्टमध्ये चालते, त्यानुसार लवकरच लोकलच्या फेऱ्यांचे नियोजन होणे गरजेचे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे चोवीस तास काम करीत असतात. ही लोकल फक्त जनरल शिफ्टमधील प्रवाशांना मिळेल परंतु रेल्वे प्रशासनने सकाळी 6.25 वा ,दुपारी दोन वाजता व रात्री पावने दहा अशा लोकलच्या तीन फे-या केल्या व तशाच पुण्याकडून लोकल सोडल्या तरच फायदा प्रवाशांना होऊ शकतो.
– प्रकाश जाधव, रेल्वे प्रवासी, मळवली.