वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा कट्टर मुस्लिम विरोधी नेता आहे. त्याचे कारण म्हणजे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सहा ते सात मुस्लिम राष्ट्रांमधील लोकांच्या अमेरिका प्रवेशाला बंदी घातली होती. त्यांची इतर वक्तव्ये आणि निर्णयही या समुदायाच्या संदर्भात विरोधात जाणारी आहे. असे असूनही जगातल्या सगळ्यांत कुख्यात संघटनेने ट्रम्प यांची स्तुती केली आहे.
अफगाणिस्तानातील सगळ्यांत कट्टर आणि कुख्यात अशा तालिबान संघटनेने ट्रम्प यांची भलावण केली आहे. ट्रम्पच पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष होतील असा दावा तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने अमेरिकेच्या एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
तुम्हाला ट्रम्प पुन्हा विजयी होतील असे का वाटते असे विचारल्यावर तो म्हणाला की ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. निर्णय घेण्याची हिंमत त्यांच्यात आहे व आपल्या देशातील स्थिती ते नियंत्रणातही ठेवू शकतात. मात्र बिडेन केवळ हवेतल्या घोषणा करतात असाही त्याचा दावा आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातल्या अन्य लहान संघटनांचा मात्र वेगळा सूर आहे. बिडेन यांना संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र या संघटना केवळ हे लोक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांशी जोडले गेले आहेत. त्यांचाच ट्रम्प यांना विरोध आणि बिडेन यांना पाठिंबा हवा आहे, असेही म्हटले जाते आहे.
ट्रम्प पुन्हा विजयी झाले तर युध्द थांबेल, अफगाणिस्तानातील अमेरिकेचे पूर्ण सैन्य मागे घेतले जाईल. मात्र ज्यांना शांतता नको आहे व युुध्द सुरूच ठेवायचे आहे, त्यांना बिडेन हवेत आहेत, असे काहींचे म्हणणे आहे.
दरम्यान, तालिबानने ट्रम्प यांची प्रशंसा केल्यामुळे ते अडचणीत येउ शकतात. कारण अमेरिकेचे शत्रुही ट्रम्प यांच्या विजयाची वाट पाहतो आहे, असा प्रचार ट्रम्प विरोधी गटाकडून केला जाउ शकतो. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या प्रचार विभागाने तातडीने आपली भूमिका मांडली आहे. ट्रम्प नेहमीच अमेरिकेच्या हिताचे रक्षण करतील हे त्यांनी (तालिबान) समजून घ्यावे. त्याकरता त्यांना जे काही करावे लागेल ते ट्रम्प करतीलच असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तालिबानने ट्रम्प यांची प्रशंसा करताना जो दावा केला आहे, तो निराधार नाही. त्याचे कारण ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेत विशेष लक्ष घातले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानात आता केवळ पाच हजार अमेरिकी सैन्य आहे. इतकेच नव्हे, तर नव्या वर्षाच्या सुरूवातील केवळ अडीच हजार सैन्य अफगाणात राहील अशी घोषणाच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही केली आहे.
ट्रम्प प्रशासनाने तर तालिबानांशी करारही केला आहे. त्यात पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचे सर्व सैन्य अफगाणातून मागे घेतले जाण्याचा शब्द दिला आहे.