गुगल सर्च करताना सावधान !

लंडन : दिवसेंदिवस वाढत असलेले ऑनलाईन फ्रॉडस पाहता, नागरिकांनी गुगलवर विशिष्ट माहिती शोधताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे निष्कर्ष “ऑनलाईन डेटाबेस मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन’च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आज जगभर सर्वच जण कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर लगेचच गुगल सर्च करतात. त्यात आवडत्या गाण्यापासून ते जेवणाच्या पदार्थांपर्यंत अनेक गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. मात्र अनेकदा गुगल सर्च महागात पडण्याची शक्‍यता असते. एका चुकीच्या सर्चमुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो, असे या स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे. त्यामध्ये काय सर्च करताना कोणती काळजी घ्यायची याची यादीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ऑनलाइन बॅंकिंग वेबसाइट
ऑनलाइन बॅंकिंग सर्विसचा वापर करण्यासाठी गुगलवर बॅंकेची वेबसाइट आणि युआरएल सर्च केला जातो. कधीही वेबसाइटचा वापर करताना बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा. बॅंकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांची अधिकृत वेबसाइट नमूद केलेली असते. अनेकदा गुगल सर्च केल्यावर बॅंकांच्या खोट्या वेबसाइटच्या लिंक समोर येतात. जर अशा फेक लिंकचा वापर करून तुम्ही बॅंकेच्या डिटेल्स दिल्या तर तुमची माहिती हॅकर्सला मिळू शकते व तुमच्या अकाउंटमधील सर्व रक्कम हॅकर्स काढून घेऊ शकतात.

कंपनी कस्टमर केअर नंबर
कोणत्याही कंपनीच्या प्रोडक्‍टची तक्रार करण्यासाठी आपण कंपनीचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च करतो. अनेकदा तुम्हाला गुगलवर फेक कस्टमर केअर नंबर सापडतो. तुम्ही या फेक नंबरवर कॉल केल्यास अनेकदा तुमची खाजगी माहिती हॅकर्स पर्यंत पोहचते.

ऍप अथवा सॉफ्टवेअर
अनेक नागरिक अनेकदा गुगलवर कोणतेही ऍप आणि सॉफ्टवेअर सर्च करतात. गुगल सर्चमध्ये अनेकदा फेक ऍप आणि सॉफ्टवेअर देखील असतात. हे ऍप डाउनलोड केल्याने तुमच्या मोबाईल/लॅपटॉप अथवा पीसीला नुकसान होते. त्यामुळे गुगलवरून ऍप डाउनलोड करू नयेत.

मेडिकल प्रिस्क्रिप्शन
आजारी पडल्यावर अनेक युजर्स आजाराच्या लक्षणांच्या आधारावर गुगलवर औषधे शोधत राहतात. गुगलवरून माहिती घेऊन औषध खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डॉक्‍टरांनी सांगितलेलीच औषधे घ्यावीत. गुगलवरील याबाबतीत विश्‍वास ठेवता येणार नाही.

पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केट
गुगल सर्चवर फायनान्स आणि स्टॉक मार्केटची माहिती विश्वसनीय व्यक्तींकडूनच मिळेल असे नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

सरकारी वेबसाइट
हॅकर्स सरकारी वेबसाइट आणि पोर्टलच्या डुप्लीकेट वेबसाइट बनवून लोकांना फसवत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी वेबसाइटच्या शेवटी gov/nic/in असे नमूद करण्यात आलेले असते. अशा वेबसाइटची खात्री करूनच ती साइट उघडावी.

ई-कॉमर्स
शॉपिंगसाठी आपण ई-कॉमर्स वेबसाइट वापरत असतो. कधी कधी चुकून फेक ई-कॉमर्स साइटवर जर तुम्ही तुमच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डची माहिती दिली तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

ऍन्टीव्हायरस
कधीही ऍन्टीव्हायरस गुगलवर सर्च करू नये व डाउनलोड ही करू नये. चुकीने तुम्ही ऍन्टीव्हायरसच्या जागी व्हायरस असणारे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले असू शकते. यामुळे तुमचा डिव्हाईस आणि कॉम्प्यूटर खराब होऊ शकतो.

कूपन कोड्‌स
कॅशबॅक आणि गिफ्टच्या नादात आपण अनेकदा गुगलवर कूपन कोड सर्च करतो. गुगलवर अनेकदा फेक कोड्‌स सापडतात. तुम्ही या फेक कोड्‌सचा वापर करताच, तुमची बॅंकिंग माहिती चोरीला जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.