फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी ः अयोध्या प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवा
नाशिक : राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही पाच वर्षे स्थिर सरकार दिले. पूर्ण बहुमताशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रगतीशील, विकसनशील राज्य दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार देण्याची महाराष्ट्राची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींचे हे वक्तव्य शिवसेनेला सूचक इशारा मानला जात आहे.

पवारांकडून काश्‍मीर मुद्‌द्‌यावर अपप्रचार
मतांसाठी शरद पवारांकडून काश्‍मीर मुद्‌द्‌यावर अपप्रचार केले जाणे दुर्देवी असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. कॉंग्रेस गोंधळले आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचे विधान करत असेल तर फार दुख होते. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्‍टरी कुठे आहे? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात?, असा हल्लाबोल करत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये झाला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

नरेंद्र मोदी म्हणाले, अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून न्यायालयावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्य केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणे आवश्‍यक आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत. सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे? आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या पंचवटीतील तपोवनात होत असलेल्या जाहीर सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, यासाठी गुरुवारी सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)