लखनौ – मुरादाबाद येथे लग्नात सामील होण्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाची कार अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला आणि नंतर झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर चालकासह पाच जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आजीमनगर पोलीस ठाणे हद्दीतील लालपूर ते खळद मार्गावर घडला. मुरादाबादच्या दिलारी पोलीस स्टेशन हद्दीतील राहाता माफी गावात राहणाऱ्या विशालचे लग्न रामपूरच्या काशीपूर आंगा गावात राहणाऱ्या सोनमसोबत ठरले होते. शुक्रवारी दुपारी 10 वऱ्हाडी आणि चालक दिलारी येथून कारने काशीपूर आंगा येथे जात होते. यादरम्यान आजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी तीन च्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटून कार विजेच्या खांबाला धडकली, त्यानंतरही कार न थांबता झाडावर आदळली. अपघातात विजेचा खांब आणि झाड कोसळले असून कारमधील सहा जणांना जागीच मृत्यू झाला.