नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करून प्रकाशझोतात आलेला स्टॅंडअप कॉमेडियन श्याम रंगीला याने आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. राजस्थानमधील आपचे प्रभारी विनय मिश्रा यांच्या उपस्थितीत श्याम रंगीलाने आपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या आवाजातील बारकाव्यांसह हुबेहुब नक्कल करण्यासाठी श्याम रंगीला प्रसिद्ध आहे. आजपर्यंत त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारच्या कामांचे त्याने कौतुक केले. माझे काम पसंत न पडल्यास पुढच्यावेळी मला मतदान करु नका, असे जाहीरपणे सांगणारा आम आदमी हा एकमेव पक्ष असल्याचे रंगीला याने सांगितले. मी आपच्या कामगिरीमुळे प्रभावित झाल्यामुळेच मी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने नमूद केले.
मला पक्षात तुर्तास कोणतेही पद देण्यात आलेले नाही. सध्या मला स्वतंत्रपणे काम करण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्याने स्पष्ट केले. रंगीला मोदी यांच्यासोबतच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करण्यावरून छोट्या पडद्यावर आणि सोशल मीडियावरही सगळीकडे पोहोचला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशनंतर आपने आता राजस्थानात हालचाल सुरू केल्याचे आता या प्रवेशावरू दिसून येते आहे.