मराठी चित्रपटाला निदान महाराष्ट्रात तरी मोकळा श्‍वास घेता येईल का?

सिनेमा हिंदी असो, मराठी असो वा इतर कोणत्याही भाषेतील असो आजच्या युगात चित्रपटाचे भवितव्य हे त्या चित्रपटाला मिळालेल्या ‘स्क्रीन्सवर’ अवलंबून असते. त्यातच मग चित्रपटाला मिळालेल्या ‘स्क्रीन्स’ कोणत्या वेळेला मिळाल्या आहेत? हा फॅक्‍टर देखील त्या चित्रपटाच्या व्यावसायिक यशावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडताना दिसतो.

मागच्या काही काळापासून आपण मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांनमध्ये ‘स्क्रीन्स’च मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मराठी चित्रपटांना ‘बॉलिवूड’ अथवा ‘टॉलिवूड’ प्रमाणे खास असा प्रेक्षकवर्ग नाहीये हे सत्य नाकारता येण्यासारखे नक्कीच नाहीये. मात्र याचा अर्थ मराठी चित्रपट हे दर्जाहीन आहेत असा होत नाही. मराठी चित्रपटांद्वारे आजपर्यंत अनेक दर्जेदार प्रयोग सादर करण्यात आले आहेत आणि ते यापुढेही सुरु राहतील परंतु अशा दर्जेदार प्रयोगांना आता निदान आपल्या ‘प्रांतात’तरी न्याय मिळायला हवा.

मराठी चित्रपटांच्या बाबतीमध्ये अनेकदा आपल्याला पाहायला मिळते की मध्यमवर्गीय प्रेक्षक केंद्रित असलेल्या मराठी चित्रपटांना मुद्दामून दुपारचे ‘शोज’ दिले जातात. चाकरमानी मराठी माणूस मग अशावेळी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवत असेल तर ती चूक मराठी चित्रपटांची की त्या चित्रपटाच्या ‘शो’ला देण्यात आलेल्या वेळेची? असा प्रश्‍न उपस्थित होतो. काहीवेळेस तर “शो कॅन्सल झाला” असं केविलवाणं कारण देत ऑनलाईन बुक केलेले मराठी चित्रपटाचे तिकीटच रद्दबाद ठरवले जाते आणि प्रेक्षकांना इतर चित्रपटांना बसवण्याची व्यवस्था लावण्यात येते. मध्यंतरी रिलीज झालेल्या जेष्ठ लेखक पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित “भाई- व्यक्ती की वल्ली” या चित्रपटाला स्क्रीन्ससाठी त्यांच्याच कर्मभूमी पुण्यामध्ये खस्ता खाव्या लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड थिएटर मालकांकडून नेहमीच केली जाते. परंतु मराठीत देखील अनेक उत्तम कलाकृती निर्माण होत आहे. समाजातील अनेक समस्यांवर आधारित विषयांना मराठी दिग्दर्शक हात घालत आहे. मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद उदंड होता. तरीही बॉलीवूड चित्रपटांना आधी महत्व दिले जाते. मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत आहे. मराठी चित्रपट महाराष्ट्रात नाही तर आणखी कुठे प्रदर्शित केले जाणार? आणि जो पर्यंत मराठी चित्रपट प्रदर्शितच केले जाणार नाही तोपर्यंत त्याला प्रेक्षक वर्ग तरी कसा मिळणार?
– वैभव गाटे


मराठी चित्रपटांबाबत बोलायचं झाल्यास, मराठी चित्रपटांमध्ये सारखे सारखे तेच तेच विषय चघळले जाण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रेक्षकाला नाविन्यपूर्ण कथा पाहायला मिळाल्यास मराठी प्रेक्षक देखील मराठी चित्रपट डोक्‍यावर घेतात हे आपण सैराट, रेगे सारख्या चित्रपटांमधून पहिले आहे. चित्रपटाचे व्यावसायिक यश हे मोठयाप्रमाणावर महानगरांमधील प्रेक्षकांवर अवलंबून असते. महानगरांमध्ये राहणाऱ्या तरुणाईतील मराठी चित्रपटांबाबतची अनास्था आणि मराठी जनतेचा महानगरांमधील कमी होत चाललेला टक्का ही कारणे देखील मराठी चित्रपटांच्या अपयशामध्ये भर घालतात.
– अक्षय साळी


मराठी लोक मराठी सिनेमा प्राईम टाइमला पाहतात त्यामुळे चित्रपटगृहांनी मराठी सिनेमाला प्राईम टाइम देणं गरजेचं आहे. बाकीच्या राज्यांमधील चित्रपटगृहे प्रादेशिक सिनेमाला जेवढे महत्व देतात तेवढे महत्व महाराष्ट्रातील चित्रपटगृहांनी सुद्धा मराठी चित्रपटांना द्यायला हवे. राज्य सरकारच्या मदतीने मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहे बांधणाऱ्या मराठी उद्योजकांना योग्य आधार दिला पाहिजे.
– अक्षय भुजबळ

– ऋषिकेश जंगम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.