मुंबई- ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाचा सामना करत होते. त्यांनी शुक्रवारी सकाळी 10.45 वा. अखेरचा श्वास घेतला. मिलिंद सफई यांनी अनेक लोकप्रिय मराठी चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
मिलिंद सफई मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीचे कलावंत होते. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी फेसबूक पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
सफई यांनी हिंदी कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिले . मराठी मालिकांतून ते घरोघरी पोहोचले होते. मेकअप, थॅंक यू विठ्ठला, पोस्टर बॉय, छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्ट, टार्गेट आदी अनेक मराठी चित्रपटांत काम केले होते. याशिवाय आई कुठे काय करते, आशिर्वाद तुझा एकविरा आई, सांग तू आहेस का, 100 डेज, पुढचं पाऊल या मालिकांतही त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.