महिलांनी साजरा केला संक्रांतीचा सण
आळंदी – नवीन वर्षातील पहिल्या मकर संक्राती सणासाठी पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सावित्रीच्या लेकी आकर्षक पेहराव करीत पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत श्रीक्षेत्र अलंकापुरीतील माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात एकत्रितपणे आल्या होत्या. यावेळी ओंब्या, ऊस, बोरं, वाळलेल्या शेंगा, तसेच सर्व भाज्या एकत्रित करून तयार केलेल्या सुगड्यांचा ओवसा, हळदी-कुंकू आणि पूजेच्या साहित्याची ताटे हातात घेऊन त्यांनी माऊलींना ओवसण्यासाठी संपूर्ण दिवसभर समाधी मंदिरात गर्दी केली होती.
माऊलींना ओवसण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिरातील मोकळ्या जागेत गटागटाने एकत्रित बसून एकमेकींना हळदी-कुंकू लावत सुगडीतील साहित्याची देवाणघेवाण करीत या लेकींनी एकमेकींची गळाभेट घेतली आणि मकर संक्रातीच्या एकमेकींना शुभेच्छा दिल्या. आजच्या या मकर संक्रांतीदिनी आळंदीच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा वैजंयता उमरगेकर, त्यांच्या सर्व नगरसेविका सहकारी, तसेच नियती फाउनडेशनच्या नियती शिंदे, रुपाली पानसरे, मीना पाखरे, पुष्पा लेंडघर, प्रणिती लेंडघर, पुनम पाखरे, संगीता जठार आदींसह आळंदी आणि परिसरातील मान्यवर सावित्रीच्या लेकी माऊली मंदिरात उपस्थित होत्या.
येथील जैन स्थानक मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून संक्रातीला जैन बांधवांमार्फत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात येत असल्याचे जैन श्रावक संघाच्या अध्यक्ष माजी नगराध्यक्ष शारदा वडगावकर, चंचला भळगट आणि निकिता भळगट यांनी सांगितले. संपूर्ण दिवसभर पीएमपीएलची सेवा अखंड सुरू होती.
श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात प्रक्षाळपूजेचा मान आळंदीकरांना
आज पहाटे येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून वार्षिक उत्सव सुरू असून आज पहाटे स्वामींच्या संजीवन समाधीची प्रक्षाळ पूजा बांधण्यात आली होती. त्यात प्रथम मानकरी हे आळंदीतील रानवडे कुटुंब, वहिले, कुराडे ,घुंडरे, जाधव, पाखरे, मुंगसे आदी ग्रामस्थांना प्रक्षाळ पूजेचा मान देण्यात आला.