चंद्रशेखर जैस्वाल; महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यात विविध उपक्रम
महाबळेश्वर – पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यात सर्वत्र विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमांअंतर्गत उद्यापासून पर्यटकांना येथील रिसॉर्टमध्ये पारंपरिक चुलीवरचे जेवण आणि तेही मातीच्या भांडयात उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. या वेळी येथील रिसॉर्टचे शाखा व्यवस्थापक सुहास पारखी उपस्थित होते.
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळ कात टाकत आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता आहे आणि याचा लाभ स्थानिक भूमिपुत्रांनाच झाला पाहिजे, या दृष्टीने महामंडळाने पर्यटकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकीच “एक चुलीवरचे जेवण’ या योजनेनुसार पर्यटकांना अस्सल महाराष्टीय जेवण आणि तेही मातीच्या भांड्यात मिळणार आहे. “पौर्णिमा महोत्सव’ ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत स्थानिक कलाकार, व्याख्याते, लेखक अशा स्थानिकांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन रिसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांचे मनोरंजन केले जाते. याशिवाय येथे महाराष्टाची संस्कृती असलेले पारंपरिक खेळ भरविले जातात, पर्यटकांना शिकविले जातात. यामध्ये विटीदांडू, लगोरी, गोटया, पतंगबाजी, भोवरा, आईचे पत्र हरविले अशा अनेक खेळांचा समावेश आहे. आजअखेर येथे चौदा पोर्णिमा महोत्सव पार पडले असून राज्यातील अशा प्रकारचे हे एकमेव रिसॉर्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महामंडळाच्या वतीने कृषी पर्यटनही उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांबरोबर सामंजस्य करार केला असून अशा ठिकाणी राहण्यासाठी थेट महामंडळातून आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांना साहसी खेळासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शनही केले जाते. यामध्ये जंगल ट्रेकिंग, माउंटिंग, रॅपलर्स हायकर्स याची संधी आहे.
पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टची माहिती राज्यातच नव्हे तर जगभर व्हावी, यासाठी सोशल मीडियावर सतत अपडेट दिले जातात. रोज एक व्हिडिओ, विविध प्रकारचे फोटो, पर्यटकांचे अनुभव येथे पाहावयास व वाचावयास मिळणार आहेत. रिसॉर्टमध्ये स्वच्छतेकडे खास लक्ष दिले जाते, पर्यावरण रक्षण व संवर्धन केले जाते.
पाण्याची पुरेपुर काळजी घेतली जाते. “इकॉनॉमी रूम’मधील शॉवर व दुरचित्रवाणी संच काढण्यात येणार आहे, त्याचबरोबर पावसाळी पर्यटन, विविध फेस्टिव्हल, स्टॉबेरी, तांदुळ कोकण महोत्सव भरविले जाणार आहेत. याठिकाणी राज्यातील सेलिब्रिटीजना बोलावून पर्यटकांना त्यांच्याबरोबर गप्पा, जेवण व फोटोसेशन करण्याची संधी महामंडळाच्या वतीने उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली
पर्यटक आता शेतीच्या बांधावरही
शेती भेट योजनेत महाबळेश्वर सहलीवर आलेल्या पर्यटकांना येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील पाच अल्पभूधारक शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शेतीला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 रूपये दिले जातात.
याबरोबरच शेतकऱ्यांच्या घरी पर्यटकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यासाठी 500 रूपये पर्यटकांना द्यावे लागणार आहेत. यामुळे शेतीची माहिती व त्यांच्या घरी भोजनाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. यासाठी शिरवली, बिरवाडी, चिखली या गावांची निवड करण्यात आली आहे.