ST Bus : ऐन दिवाळीच्या दिवसांत गुणरत्न सदावर्तें यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. मात्र या बंदला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. एसटी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सर्वसमावेश समिती स्थापन करावी, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी आणि राज्यातील ८५ टक्के एसटी वाहनांचा विमा काढलेला नसल्याने एसटी गाड्यांचा विमा काढावा यासाठी सोमवारपासून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, असे कष्टकरी जनसंघाच्या वतीने सदावर्ते यांनी सांगितले होते.
परंतु आंदोलनाबाबत भाष्य करताना सदावर्ते म्हणाले, आंदोलन सुरू करण्याआधी या सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवले आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेनंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करु. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसत आहे.
सध्या राज्यभरातील एसटी वाहतूक सुरु आहे. वर्धा आणि कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत. तसेच सणासुदीच्या काळात चक्का जाम आंदोलन मागे घेण्यासह मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी मंत्री उदय सामंत चर्चा करणार आहेत, अशी शक्यता वरिष्ठ एसटी अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, दोन वर्षापूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यवतमाळ, वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे, हिंगोली या भागामध्ये एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे.