विविअनचा आज 65वा वाढदिवस. सकाळीच मुलगा फिलिप्स व नात जेनिफरने त्यांचे अभिनंदन केले. मुलगा घराबाहेर पडताना म्हणाला की, आज येताना तुमचा स्पेशल ब्राऊनी चीज केक घेऊन येतो. मग जेनिफरला सांगतो, माझे काम आटपले की सायंकाळी फोन करतो मग तू ये बाजूच्या मॉलमधून आपण केक घेऊ.
फिलिप्स बाहेर पडतो व विविअन नंतर विचार करत राहतो. एवढे वर्षे काम करून कमावलेला पैसा त्याच्या पत्नीच्या आजारपणात पूर्ण खर्च झाला व त्यातूनही ती वाचली नाही. नंतर फिलिप्सचे लग्न होते पण त्याची पत्नीही अपघातात जाते. बारा वर्षांची नात शिकत असते मग फिलिप्सचीही नोकरी जाते. तो छोटी मोठी कामे करत असतो व कसे तरी त्यांचे दिवस जात असतात. विविअनलाही चिंता वाटत असते की तो केक कसा आणेल? करण तेवढे पैसेही मिळणे कठीण असते.
सायंकाळी फिलिप्सचा फोन आल्यावर जेनिफर मॉलकडे जाते. तिथे दोघं आत जाऊन स्पेशल ब्राऊनी चीज केक बघतात. केकची किंमत 65 डॉलर्स समजते. त्याला आज जेमतेम 50 डॉलर्स मिळालेले असतात. बिलींग काउंटरवर उगाच विचार करतात. मागे असलेला एक तरुण आरडाओरडा करत असतो, लवकर आटपा. काही झाले तरी केक घेणे शक्य नसते मग केक कॅन्सल करून इतर काही आवश्यक वस्तू घेऊन बाहेर पडतात. जेनिफरला रडायलाच येते व म्हणते की, आज तो केक घ्यायला पाहिजे होता. फिलिप्सला खूप वाईट वाटते, पण काय करणार. जड पावलांनी ते चालू लागतात.
इतक्यात मागून एक तरुण धावत येतो, जो काउंटरवर आरडाओरडा करत असतो. यांच्यापाशी येऊन तो केक त्यांच्या हातात देतो व म्हणतो, हा घ्या तुमचा केक. फिलिप्स जेनिफरला अत्यानंद होतो व फिलिप्स त्यास अत्यंत नम्रपणे म्हणतो, धन्यवाद. पण तू केक आम्हाला का देत आहेस?
त्यावर तो तरुण म्हणतो, लहानपणी माझ्या वाढदिवसाला एक रिमोट कार मला हवी होती, पण पैसे नसल्यामुळे माझी आई घेऊ शकली नाही. आम्ही तुमच्या सारखेच बाहेर पडलो. मग मागून एक सद्गृहस्थ आले. त्यांनी आम्हाला ती कार दिली. आईने सांगितले, आम्ही पैसे देऊ शकत नाही. त्याने एक कार्ड दिले. त्यावर लिहिले होते “टेक इट फॉरवर्ड’ तो म्हणाला, तुम्हाला पुढे शक्य झाल्यास दुसऱ्याला अशीच मदत करा व ते कार्ड त्याला द्या. आज मला शक्य झाले. पुढे तुम्ही कुणालाही अशीच मदत करा व तो ते कार्ड देऊन गेला.
दोघं आनंदाने घरी येऊन विविअनचा वाढदिवस साजरा करतात व विविअनलाही आनंद होतो. पण तो विचारतो, एवढे पैसे कसे मिळाले? फिलिप्स सर्व घटना सांगून ते कार्ड विविअनच्या हातात देतो. विवियन कार्ड बघतो व क्षणात त्याचे डोळे चमकतात. 35 वर्षांपूर्वी त्यानेच हे कार्ड एका छोट्या मुलाच्या हातात कार देताना दिले होते. तो फिलिप्सला एवढेच म्हणतो, पुढेमागे तुला जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की अशा गरजूला मदत कर आणि हे कार्डही दे. “यू शुड टेक इट फॉरवर्ड’ असे म्हणून त्याच्या हाती कार्ड देतो.
– उत्तम पिंगळे