पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील मोहज देवढे येथे एक करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर मोहोज देवढे गावचा संपूर्ण परिसर सात दिवसासाठी (दि. 10 मे पर्यंत) प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून सात पथके तयार करण्यात आलेली आहेत. यामध्ये शिक्षक, आरोग्य सेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असुन या पथकांकडून घरोघर जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. गावात येणारे व बाहेर जाणारे यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.
मोहज देवढे गावातील बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 संशयितांच्या घशातील स्त्राव पुणे येथील लष्करी आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. ते सर्व निगेटीव्ह आल्याने तालुक्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे. निगेटिव्ह आलेल्या 25 नागरिकांना प्रशासनाने पाथर्डी येथील गायछाप कारखान्याजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पुढील 14 दिवसांसाठी ‘क्वारंटाईन’ केले आहे.मोहज देवढे येथे करोनाबाधित रुग्ण आढल्यानंतर प्रशासनाकडून सतर्कता पाळली जात आहे. मोहोज देवढे अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी, हाकेवाडी, रुपनरवाडी, बहिरवाडी हा संपूर्ण परिसर 10 मे पर्यंत प्रशासनाकडून सिल करण्यात आला आहे. या परिसराला जोडणारे सर्व रस्ते दगड, काट्या टाकून बंद करण्यात आले आहेत.
पाथर्डीकडून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाचे मुख्य प्रवेशद्वार बांबूचा अडथळा बांधून बंद करण्यात आले आहे. गावातून बाहेर जाण्यास व गावात येण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मोहज देवढे गाव सिल केल्यानंतर ऊस तोडणीवरून आलेले काही कामगारांना गावाबाहेर शेतात पाल टाकून राहावे लागत आहे. बंद काळात त्यांना अत्यावश्यक वस्तूंची मदत ग्रामस्थांकडून केली जात असल्याचे सरपंच गणेश चितळकर यांनी सांगितले.