महापालिकेच्या एका निर्णयामुळे होणार 190 कोटींची बचत
पुणे – समान पाणी पुरवठा योजनेच्या कामातून अखेर केबल डक्ट टाकण्याचे काम रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने ठेवला असून आयुक्तांच्या अंतिम मान्यतेनंतर तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांनी हे डक्ट टाकण्याचा हट्ट धरत हे काम प्रस्तावित केले होते. दरम्यान, हे काम रद्द झाल्याने समान पाणी योजनेचा खर्च 190 कोटी रुपयांनी कमी होऊन आता ही योजना 2,335 कोटींमध्येच ही योजना होणार आहे.
समान पाणी योजनेसाठी महापालिका प्रशासनाकडून पहिल्या निविदा काढण्यात आल्यानंतर आयत्यावेळी कुणाल कुमार यांनी सुमारे 400 कोटींच्या डक्टचे काम या योजनेत प्रस्तावित केले. त्यामुळे योजनेचा खर्च अचानक वाढला, तसेच निविदाही जादा दराने आल्या. त्यामुळे ही योजना तब्बल 3,500 कोटींच्या घरात पोहचली. त्यामुळे पालिका प्रशासनाला जोरदार टीकेचा सामना करावा लागल्यानंतर ही जादा दराची निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत ही निविदा तब्बल 1 हजार कोटींनी कमी होऊन 2,521 कोटींवर आली. त्यात डक्टचा खर्चही 400 कोटींवरून 190 कोटींवर आला.
त्यानंतर आता जेव्हा प्रशासनाकडून या योजनेसाठी 1,600 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले तेव्हा, हे केबल डक्ट प्रत्यक्षात टाकता येत नसल्याचे समोर आले आहे. डक्टसाठी पाणी योजनेच्या जलवाहिनीच्या बाजूला 2 मीटर जागा सोडणे आवश्यक आहे.
मात्र, ज्या भागात ही जागा सोडायची त्या भागात आधीच जमीनीत एमएनजीएल गॅसवाहिनी तसेच ड्रेनेजलाइन आहेत. त्यामुळे डक्ट टाकल्यास त्या दोन्ही वाहिन्यांची दुरुस्ती करणे अवघड आहे. त्यातच डक्ट सरसरकट न टाकता तुकड्याने टाकला जाणार आहे. त्यामुळे डक्टच्या कामासाठी समान पाणी योजनेच्या जलवाहिनीचे काम बंद ठेवावे लागत आहे. परिणामी, डक्ट आणि समान पाणी योजनेची जलवाहिनी सोबत टाकणे शक्य नसल्याने डक्टचे काम वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली असून तो अंतिम मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर ही आर्थिक बाब असल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.