जयपूर – राजस्थानातील कॉंग्रेसच्या एका नेत्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भाजप आयटी सेलने त्यांच्या सोशल मिडीया हॅंडलवर राहुल गांधी यांना रावणाच्या स्वरूपात दाखवले आहे, त्यासंबंधात ही याचिका आहे.
नड्डा आणि मालविय यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस जसवंत गुर्जर यांनी आपल्या याचिकेत केली आहे. जयपूर मेट्रोपॉलिटन कोर्ट-11 मध्ये याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवरील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत एक्स हॅंडलवर राहुल गांधी यांचे रावणाच्या स्वरूपातील हे पोस्टर टाकण्यात आले आहे. या याचिकेत म्हटले आहे की, भाजपच्या नेत्यांनी जाणूनबुजून राहुल गांधींना रामविरोधी आणि धर्मविरोधी म्हणून लोकांना भडकवलं आहे. वरील दोन्ही आरोपींचे जबाब नोंदवून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर केली आहे.
कॉंग्रेस पक्षाने देशभरात अनेक ठिकाणी या पोस्टरविरोधात निदर्शने केली आहेत. भाजपने पोस्टरसोबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवीन युगाचा रावण आला आहे. तो दुष्ट आहे. धर्मविरोधी. राम विरोधी आहे. भारताचा नाश करणे हे त्यांचे ध्येय आहे.