लखनौ – उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर या लोकसभेच्या दोन मतदार संघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवून समाजवादी पार्टीला आणखीन एक धक्का दिला आहे. भाजपचे उमेदवार दिनेश लाल यादव हे आझमगड मतदार संघातून तर घनशाम सिंह लोधी हे रामपूर मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांनी अनुक्रमे धर्मेंद्र यादव आणि असिम राजा यांचे पराभव केले. दिनेश लाल यादव यांनी 8 हजार मतांनी तर लोधी यांनी तब्बल 42 हजार मतांनी ही पोटनिवडणूक जिंकली.
या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचे प्राबल्य होते. रामपूरच्या जागेवर समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान आणि आझमगडच्या जागेवरून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे लोकसभेमध्ये निवडून गेले होते. मात्र उत्तर प्रदेशच्या निवडणूकीपूर्वी या दोघांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्यामुळे समाजवादी पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
रामपूरच्या जागेवर भाजप विरुद्ध सपा अशी थेट लढत होती. येथे बसपाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. एकूण 17 लाख मतदारांपैकी 10 लाख मुस्लिम मतदार असल्याने येथे सपा विजयी होईल, असे भाकित वर्तवले जात होते.
आझमगड हा देखील सपाचा बालेकिल्ला समजला जातो. तेथे भाजपचे उमेदवार आणि भोजपुरी अभिनेते दिलेश यादव निरहुआ यांनी सपाच्या धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला. धर्मेंद्र यादव हे अखिलेश यादव यांचे पुतणे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोटनिवडणुकीतील विजयाबद्दल विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.