लोणी धामणी -आंबेगाव तालूक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, जारकरवाडी, बढेकरमळा, पोंदेवाडी, खडकवाडी, रानमळा, वाळुंजनगर परिसरात सध्या गवार तोडणीची लगबग जोरात सुरू आहे.
गवारीला सध्या चांगलाच बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आनंदी व समाधानी दिसत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात गवार लागवड केली आहे. लागवडीनंतर साधारण 40 ते 50 दिवसात गवार तोडणीला येते. तोडणीला आलेल्या गवारीचे सहा ते सात तोडे होतात. बाजारभाव चांगला मिळाला तर दोन पैसेही मिळतात. सध्या गवारीला दहा किलोस 450 ते 550 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.
लोणी -धामणी परिसरात कमी क्षेत्रात जास्त व शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे प्रमुख तरकारी पीक म्हणून गवार उत्पादन घेतले जाते. कमी पाणी व खर्च असल्याने शेतकऱ्यांचा कल गवार पिकाकडे आहे. प्रति हेक्टरी मशागत, बियाणे, खते औषधे, तोडणी मजुरी असा एकूण 75 हजार रुपये खर्च आहे.
खर्च वजा जाता अडीच ते तीन लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो. त्यामुळे या भागातील 40 ते 50टक्के शेतकरी गवार पिकाला पसंती देत आहेत. सरासरी दीड ते दोन महिने चालणाऱ्या या पिकातून हेक्टरी 125 ते 130 पिशव्या (पाच टन) उत्पादन निघते. शाश्वत व उच्च प्रतीचे गवार पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे ‘लोणी धामणी’ च्या गवार उत्पन्न पॅटर्न ची चर्चा सर्वत्र होत आहे.