कोथरूड – एनडीए चौकातील उड्डाणपुलाचे काम घाईगडबडीत करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर पहिला खड्डा पडला आहे. इतर ठिकाणीही चिरा दिसू लागल्या आहेत. एनएचएआयने हा खड्डा ठिगळ मारून बुजविला असला तरी एवढ्या चांगल्या रस्त्याला अवघ्या दोन महिन्यांत ठिगळ लागले आहे.
एनडीए चौकातील उड्डाणपूल आणि रस्तारूंदीकरणाचे काम सुरू होण्याअधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यावेळी काम करणाऱ्या संबंधित कंपनीला “कामाचा दर्जा चांगलाच पाहिजे, एकजरी तक्रार आली तर माझ्याशी गाठ आहे,’ अशी सूचना केली होती. आता या खड्डयामुळे कामाच्या दर्जाचे पितळच उघडे पडले आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? या कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा तपासणी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एनडीए चौकातील उड्डाणपूल नवीन तंत्रज्ञानातून बांधण्यात आला आहे. उद्घाटनाची तारीख दोनवेळा बदलण्यात आली. अखेर 12 ऑगस्टला उद्घाटन झाले. मात्र, हा मुहूर्त गाठण्याच्या प्रयत्नात कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष झाल्याचे आता उघड होत आहे. अवघ्या दोन महिन्यांतच एनडीएकडून बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे.
जॉइंट न भरल्यामुळे…
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी “खड्डा’स्थळी पाहणी केली. त्यानंतर खड्डा भरून डांबरीकरण केले. मात्र, डांबरीकरणाचे ठिगळ कामाच्या दर्जा दर्शवत आहे. एक्सपान्शन जॉइंट न भरल्यामुळे हा खड्डा पडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे असे किती ठिकाणी जॉइंट भरले नसतील? अन्य रस्त्यावरील कामाचा दर्जा खरच चांगला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.