सातारा, (प्रतिनिधी) – येथील करंजे पेठेतील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अभिषेक उर्फ सोमनाथ गणेश आवारे (रा. कोंडवे, ता. सातारा), ओंकार संदीप थोरात (रा. मोळाचा ओढा, सातारा) आणि रोहन विलास थोरात (रा. मतकर कॉलनी, सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.
करंजे पेठ येथील समर्थ भांडी दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी शनिवारी (दि. 23) दीड लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या होत्या. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिला होता. त्यानुसार देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक आवारे, ओंकार थोरात आणि रोहन थोरात यांनी ही घरफोडी केल्याची माहिती देवकर यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुषंगाने त्यांनी पोलीस पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याचा आदेश दिला. या पथकाने संशयितांना मोळाचा ओढा येथून अटक केली. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेचले, लक्ष्मण जगधने, शैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, अमित माने, अरुण पाटील, स्वप्निल कुंभार, अविनाश चव्हाण, अजय जाधव, अमित झेंडे, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, रोहित निकम, वैभव सावंत, सचिन ससाणे, मयूर देशमुख, शिवाजी गुरव यांनी ही कारवाई केली.