हुनान (चीन) – चीनमधील एक बुलेट ट्रेन रुळावरून घसरली आणि किमान एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 7 जण जखमी झाले आहेत. रुळावर चिखल साचल्यामुळे या बुलेट ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते आहे. ही बुलेट ट्रेन चीनच्या नैऋत्येकडील गुलायांग प्रांतातून दक्षिणेकडील गुयांगझाउ प्रांतात निघाली होती. गुइझाउ स्टेशनच्या जवळ रुळावर चिखल साचल्यामुळे डोन डबे घसरले, असे चीनमधील स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी चीनच्या हेनान या मध्यवर्ती प्रांतातील बुलेट ट्रेन देखील रुळावरून घसरली होती. त्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. 4 प्रवासी गंभीर जखमी झाले, तर 123 प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. संततधार पाऊस आणि भूस्खलनामुळे रुळावर पसरलेला चिखल यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते आहे.
चीनमधील बीजिंग ते गुआंगझाउ दरम्यानच्या बुलेट ट्रेनचा वेग ताशी 350 किलोमीटर इतका प्रचंड असेल, असे चीनमधील रेल्वेने अलिकडेच जाहीर केले होते. त्यानंतर हे अपघात झाले आहेत. ही बुलेट ट्रेन प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्यावर बीजिंग ते वुहान हे 1300 किलोमीटरचे अंतर 3 तास 48 मिनिटात कापता येते आहे. बीजिंग ते गुआंगझाउ दरम्यानच्या 2300 किलोमीटरच्या अंतचरासाठीची बुलेट ट्रेन 2012 मध्ये कार्यान्वित झाली.